लातूरात ऑक्सिजनचा तुटवडा ! कोरोना रुग्णाच्या जीवितास धोका
लातूरात ऑक्सिजनचा तुटवडा ! कोरोना रुग्णाच्या जीवितास धोका
चार दिवसात सुधारणा करा अन्यथा भाजपातर्फे तिव्र आंदोलन
लातूर दि. ०७ - लातूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय वगळता सर्वच खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच कोरोना रुग्णांना उपचाराच्या वेळीच सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा शासन आणि प्रशासन यांनी याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवावी चार दिवसात सुधारणा झाली नाही तर लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आ. अभिमन्यु पवार आणि शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटीलेटर बेडची वाढती गरज पहाता भयावह परिस्थिती दिसून येत आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड तसेच रेमडीसिवर इंजेक्शन रूग्णास उपलब्ध होत नसल्याने फार मोठी जीवीत हानी होत आहे. यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांमध्ये खुप मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर शहर हे जिल्हयाचे ठिकाण असल्याने साहजीकच संपूर्ण जिल्हायातून कोरोना रूग्ण उपचारासाठी लातूर शहरात दाखल होत आहेत.
लातूर शहरात शासकीय वगळता जवळपास सर्वच खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत वेळोवेळी कळवूनही प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याबाबत लक्ष देऊन सुधारणा करणे गरजेचे आहे मात्र पत्र देऊन फोन करून त्यांना कळून ही पालकमंत्र्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
मागील लॉकडाऊनच्या काळात २४ तास सिंगल फेस द्वारे ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरू होता. यावेळी कोरोनाने कहर केल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह अनेक कुटुंब शेतात राहात आहेत मात्र लाईट नसल्याने शेतात राहणाऱ्या अनेक कुटुंबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने संपूर्ण जिल्हाभरात सिंगल फेज द्वारे वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लस केंद्राची संख्या वाढवून कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांना लस देण्यात यावी. गरजूंना रूग्णनवाहीका वेळेवर उपलब्ध करून द्यावी. कोरोना उपाययोजना संदर्भात होत असलेली असुविधा अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने कोविड प्रतिबंध उपाययोजना आणि रूग्णास उपचार सुविधा यंत्रणेत येत्या चार दिवसात सुधारणा करावी अन्यथा कोरोना काळात राजकारण करण्याची इच्छा नसताना रुग्णांच्या हितासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, आ. अभिमन्यु पवार आणि लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी दिला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा