परळी मतदार संघातील मूर्ती गावात गावगुंडांनी दुचाकी जाळल्या
राजेभाऊ फड यांनी भेट घेऊन दिला धीर; दादागिरी खपवून न खेण्याचा दिला इशारा
परळी (प्रतिनिधी)
परळी
विधानसभा मतदारसंघात कायम दहशतीचे आणि दादागिरीचे वातावरण असल्याचे
सर्वश्रुत आहे. येथील जनतेला नेहमीच अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे
लागते. लोकसभेच्या निवडणुकीत विरोधात प्रचार केला म्हणून काहींच्या गाड्या
जाळण्यात आल्या असून, गड्याबरोबर तुलाही जाळून टाकू अशी धमकी देण्यात
आल्याचा प्रकार समोर आला आहे. मूर्ती येथील देविदास फड आणि अरुण फड या दोघा
सख्ख्या भावांच्या दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. कृषिमंत्री आणि
पालकमंत्री यांच्या गावगुंडांनी दहशत माजविणारा हा प्रकार केला असून अशी
दादागिरी यापुढे चालू दिली जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड यांनी दिला
आहे. मूर्ती येथे जाऊन त्यांनी फड कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला.
परळी
मतदारसंघातील मूर्ती या गावचे देविदास बालासाहेब फड व अरुण बालासाहेब फड
हे दोन बंधू नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे बूथ प्रमुख झाल्याने कृषिमंत्री तथा
पालकमंत्र्यांच्या गावगुंडांनी दहशत करून त्यांच्या दोन्ही दुचाकी जाळल्या
तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत राजेभाऊ फड यांचे काम केलेस तर तुलाही
जाळायला मागेपुढे पाहणार नसल्याची धमकीही विरोधकांनी दिलीय. शनिवारी
रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून, राजेभाऊ फड यांनी सोमवारी मूर्ती
येथे जाऊन फड बंधूंची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. यावर प्रतिक्रिया
देत असताना ते म्हणाले की, घडलेला प्रकार हा पालकमंत्र्यांनी पाळलेल्या
गावगुंडांनी घडवून आणला असून, मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा
त्यांचा हेतू आहे. त्यांच्या असल्या तुघलकी कारभाराला जनता कंटाळून गेली
असून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना थारा मिळणार नाही. त्यामुळे
त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. याच मानसिकतेतून पालकमंत्र्यांचे
कार्यकर्ते लोकांना दबावाखाली आणत आहेत. यापुढेही त्यांच्याकडून अनेक
गैरकृत्ये होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यावर अंकुश घालावा अशी
मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजेभाऊ फड
यांनी केली आहे.
दादागिरी खपवून घेणार नाही - राजेभाऊ फड
परळी
मतदारसंघात दादागिरी आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अन्याय
अत्याचाराच्या विरोधात बोलणाऱ्या नागरिकांचा आवाज दाबला जातो. लोकसभा
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काम केले म्हणून
मूर्ती येथील फड बंधूंच्या दुचाकी जाळून त्यांना धमक्या देण्यात आल्या.
याबाबत आम्ही पोलीस प्रशासनाशी संपर्क करून कारवाईची मागणी केली आहे.
आपल्याला भविष्यात भयमुक्त परळी करायची असून, असे प्रकार भविष्यात चालू
दिले जाणार नाही असा इशारा राजेभाऊ फड यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा