ना. पंकजाताई मुंडेंनी जालन्यात उपोषण कर्ते दीपक बोऱ्हाडे यांची घेतली भेट


 *धनगर समाजाच्या आरक्षणावर आमच्या मनात संवेदना ; समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका*


जालना ।दिनांक २७।
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या अकरा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांची राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज भेट घेतली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात आमच्या मनात संवेदना आहेत, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

   राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला भेट देऊन उपोषण सोडण्याची विनवणी केली. यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मागच्या ११ दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरु आहे. या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी इथे आलेले आहे. त्यांनी केलेल्या मागण्या मागच्या ७० वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांच्या मागण्यांसंदर्भात आमच्या संवेदना आहेत. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना बारामतीमध्ये भव्य कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. त्या शब्दाबद्दल कुणाच्याही मनामध्ये किंतू नाही.

*धनगर समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका*
-------
पंकजाताई पुढे म्हणाल्या, आदिवासी समाजाला न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.
दीपकभाऊ हे समजूतदार आहेत. त्यांनी अडमुठेपणा केला नाही, बोलतानाही त्यांनी सभ्य भाषेत मतं मांडली. दीपकभाऊ यांनी एक पर्याय दिला आहे, त्या पर्यायाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. मी पालक म्हणून इथे आले आहे, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे. एवढा लढणारा माणूस जीवावर बेतून उपोषण करत आहे, हे चांगले नाही.

*मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद ; ना. पंकजाताईंचा मुक्काम*
-------
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला, समाजाच्या मागण्यांसंदर्भात मी सकारात्मक आहे, तथापि संविधानिक चौकटीत बसवून मार्ग काढावा लागेल, त्यासाठी चर्चेकरिता या, योग्य मार्ग काढू असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात लेखी पत्र देण्याची विनंती बोऱ्हाडे यांनी केली. उद्या ते पत्र मुख्यमंत्री पाठवणार असून ना. पंकजाताई मुंडे ते घेऊन उद्या पुन्हा जालन्यात बोऱ्हाडे यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती करणार आहेत.
आजच्या भेटीच्या वेळी आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. अर्जुन खोतकर, आ. संतोष दानवे, आ. हिकमत उढाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आदी उपस्थित होते.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माजलगावात अतिवृष्टीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी करताना

दांडिया महोत्सव म्हणजे महिलांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ होय - सौ. उमाताई समशेट्टे

परळी नगर परिषद प्रभाग रचना आक्षेपाचे निकाल मिळालेच नाही